महिनाभरापासून डेनेज चेंबरमधून पाणी रस्त्यावर, व्यावसायिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार येथील शीतल हॉटेलसमोर एक महिन्यापासून डेनेजचे पाणी उघडय़ावर वाहत आहे. रस्त्यापासून या डेनेज चेंबरचे झाकण जवळपास अर्धा फूट खाली आहे. त्यामुळे त्यामध्ये रिक्षा तसेच इतर वाहने अडकून पडत आहेत. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिकांतून आणि नागरिकांतून होत आहे.
स्मार्टसिटी योजनेत बेळगावचा समावेश झाला. मात्र स्मार्टसिटीमध्ये डेनेजची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महत्त्वाचे म्हणजे ड्रेनेजचे पाणी उघडय़ावर वाहत असताना त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शीतल हॉटेलसमोर गेल्या महिनाभरापासून पाणी वाहत आहे. रमजान सण देखील झाला. त्यावेळी देखील त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यावरून महानगरपालिकेचे काम कसे चालले आहे? हे दिसून येत आहे, असा आरोप येथील नागरिकांतून होत आहे.
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. तेव्हा तातडीने या चेंबरची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.









