नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडे नागरिकांची मागणी
बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीवर उभारण्यात आलेल्या शेडची दुरवस्था झाली असून शेडवरील सर्व पत्रे खराब झाले आहेत. या ठिकाणी अंत्यविधीसाठी नगरसेविका वैशाली भातकांडे या गेल्या होत्या. त्यावेळी आलेल्या नागरिकांनी शेडची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत महापालिकेमध्ये आवाज उठवावा, असे सांगण्यात आले. त्यावर निश्चितच याबाबत पाठपुरावा करू, असे वैशाली भातकांडे यांनी सांगितले. शहरातील सर्वात मोठी आणि मुख्य स्मशानभूमी म्हणून सदाशिवनगर येथील स्मशानभूमीकडे पाहिले जाते. मात्र या स्मशानभूमीमध्ये असलेल्या शेडची अवस्था गंभीर झाली आहे. पत्रे पूर्णपणे फुटून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात भिजतच या ठिकाणी उभे रहावे लागत आहे. तेव्हा याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर या ठिकाणी इतर सुविधा उपलब्ध कराव्यात. जेणे करून अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना तसेच संबंधितांच्या कुटुंबीयांना त्रास होणार नाही. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करून ही समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.









