कवठेमहांकाळ :
रांजणी व परिसरातील रस्ते दुरुस्त करा. अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा रांजणीच्या सरपंच नीलम पवार यांनी दिला आहे.
रांजणी परिसरातील सर्वच्या सर्व रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रांजणी ते लिंबेवाडी हा रस्ता खराब झाला असून त्या रस्त्यावरून प्रवाशांना जाता-येता ही येत नाही. रात्री ऐनवेळी खड्डे चुकविताना वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.
रांजणी ते कवठेमहांकाळ स्टेशन रोड या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वारंवार या रस्ता करण्याची मागणी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळा दुरुस्त करण्याची मागणी परिसरातल्या नागरिकांनाकडून होत आहे. तसेच रांजणी ते लोणारवाडी या रस्त्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप सरपंच निलम पवार यांनी केला.
रांजणी ते अलकूड फाटा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तरीही संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रांजणी ते अग्रण धुळगाव रस्ता तीन किलोमीटरचा असून तो खराब झाला आहे. रांजणी ते माळीनगर हा रस्ता थोडा कच्चा थोडा पक्का अशी अवस्था आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परिसरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशारा सरपंच नीलम पवार, अजित खोत, शिवदास भोसले यांनी दिला आहे.








