बेळगाव : पुणे-मुंबईच्या धर्तीवर बेळगावात देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, 24 तास पाणी योजनेसाठी एलअँडटी कडून शहरात गल्ली-बोळात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. 27 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असून तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शंकर पाटील यांनी महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांना दिले आहे.
बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून महाराष्ट्राप्रमाणेच बेळगावातदेखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी परराज्यातील गणेशभक्त येत असतात. अकरा दिवस चालणारा गणेशोत्सव व देखावे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी भक्तांची गर्दी होत असते. मात्र, 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलअँडटीकडून गल्ली-बोळात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीपूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.









