पुलाची डागडुजी : रस्ता वाहतुकीसाठी खुला, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्षच
खानापूर : गेल्या वर्षभरापासून खानापूर-कुप्पटगिरी रस्त्यावर असलेल्या पुलाच्या डागडुजीसाठी अर्ज विनंत्या करण्यात आल्या. आमदारांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी दोनवेळा केली. मात्र पुलाची डागडुजी काही झाली नाही. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने गेल्या दोन महिन्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुलाची दुरुस्ती होणार नाही हे ओळखून अखेर ग्रामस्थांनीच पुलाच्या डागडुजीचा निर्णय घेतला आणि पुलाचे भगदाड आणि कठड्याची दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली. खानापूर शहराला लागून असलेल्या कुप्पटगिरी गावच्या रस्त्यावरील पुलावर मागीलवर्षी भगदाड पडले होते. आणि रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता.
याबाबत ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मागीलवर्षी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली होती. आणि पुलाच्या दुरुस्तीचे आश्वासन कुप्पटगिरी वासियांना दिले होते. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने पुलाला मोठे भगदाड पडून या पुलावरुन पूर्णपणे वाहतूक बंद झाली होती. कुप्पटगिरी वासियानी तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने केली होती. मात्र या पुलाच्या डागडुजीकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी बैठक घेऊन पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. आणि शनिवारी सकाळापासूनच पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले.
संरक्षक कठड्याची दुरुस्ती
भगदाड पडलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी सिमेंट, वाळू, खडीचे काँक्रीट घालून पुलाला पडलेले मोठे भगदाड बुजविले. तसेच संपूर्ण पुलावरील आणि पुलाच्या दोन्ही बाजूला पडलेले खड्डे आणि संरक्षक कठड्याचीही दुरुस्तीही केली आहे. ग्रामस्थांनी वर्गणीतून हे काम केले आहे. सरकारच्या सुस्त कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी स्वत:च पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. आणि प्रत्यक्षात पुलाची डागडुजी करून वाहतुकीसाठी हा पूल सुरळीत करण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याबाबत दुरुस्तीची मागणी करूनदेखील रस्त्याची डागडुजी होताना दिसत नसल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थांनीच रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. इतके होत असतानादेखील सार्वजनिक बांधकाम खाते याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे खानापूर तालुका रस्त्यांच्या समस्यांबाबतीत कोणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे.









