कुसमळी येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम ः ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
वार्ताहर/ जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. पण दुरुस्तीकडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या अपघातांची दखल घेऊन, कुसमळी येथील युवक व जांबोटी आऊटपोस्टच्या पोलीस कर्मचाऱयांनी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली.
या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात प्रवासी तसेच मालवाहतूक होते. अवजड वाहतुकीमुळे ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे कमकुवत झाला असून रस्त्याची चाळण झाल्यामुळे, बेळगाव-गोवा आंतरराज्य वाहतूक कोलमडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. परिणामी वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे कुसमळी गावच्या युवकांनी शुक्रवारी श्रमदानाने या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती केली. यासाठी कुसमळी गावचे युवक पवन गायकवाड यांनी जेसीबी व ट्रक्टरची स्वखर्चाने व्यवस्था केली. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये दगड, खडी व मुरूम घालून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. जांबोटी पोलीस आऊटपोस्टचे हवालदार सनदी व त्यांचे सहकारी तसेच श्रीराम सेना कुसमळी शाखा अध्यक्ष अनंत सावंत, बाबू शेट्टी, विजय दळवी, भैरू कल्लेहोळकर, किरण देसाई यांच्यासह सुमारे 20 ते 25 युवकांनी श्रमदान केले.
तरुण भारत वृत्ताची दखल
शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजीच्या तरुण भारतच्या अंकात बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गाची दुर्दशा या मथळय़ाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये पुलावरील खराब रस्त्याची देखील सविस्तर माहिती दिली होती. मात्र सुस्तावलेल्या प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्यामुळे, कुसमळी गावच्या युवकांनी दखल घेऊन श्रमदानाने रस्त्याची दुरुस्ती केली. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.









