कॅन्टोन्मेंटच्या इतर भागातील पथदीप दुरुस्ती करा
बेळगाव : रेल्वेस्टेशन रोडवरील पथदीप काही दिवसांपासून बंद होते. यामुळे रात्रीच्यावेळी ये-जा करणे अवघड होत होते. विशेषत: रात्रीच्यावेळी रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत होता. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंटकडून पथदीप दुरुस्ती करण्यात आले. यामुळे स्टेशन रोडवरील पथदीप पुन्हा सुरू झाले आहेत. कॅम्प, किल्ला तसेच शहराचा मध्यवर्ती भाग हा कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत येतो. बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील पथदीप देखील कॅन्टोन्मेंटकडेच येतात. रेल्वे स्थानकाचा विकास झाल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु पथदीप बंद असल्याने ये-जा करणे काहीशी अवघड होते. त्यातच भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे पथदीप बसविण्याची मागणी केली जात होती. सोमवारपासून रेल्वेस्थानक परिसरातील पथदीप दुरुस्ती करून नवीन बल्ब बसविण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंटच्या दुरुस्ती पथकाकडून या परिसरात काम सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबरोबर कॅन्टोन्मेंटच्या इतर भागातील पथदीप दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.









