पावसाच्या पाण्यामुळे भिंतीची झाली होती पडझड
बेळगाव : काँग्रेस रोडनजीकची रेल्वेची भिंत काही ठिकाणी कोसळली होती. यामुळे जनावरे, तसेच नागरिकही या ठिकाणाहून ये-जा करत असल्याने धोका निर्माण झाला होता. सोमवारी ज्या ठिकाणी काँक्रिटची भिंत कोसळली होती, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. चार वर्षांपूर्वी बेळगावमध्ये रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. काँग्रेस रोडला लागूनच रेल्वेरूळ असल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी भिंत बांधावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. याची दखल घेत काँग्रेस रोडपासून तिसरे रेल्वेगेटपर्यंत रेल्वेरूळाच्या बाजूने काँक्रिट प्लेटद्वारे भिंती उभारण्यात आल्या.
काही दिवसांनी यातील भिंती जोराच्या पावसामुळे कोसळल्या. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस रोड परिसरात पावसाचे पाणी साचले होते. त्यावेळी माती खचल्याने भिंती एका बाजूला कलंडल्या होत्या. भिंत कोसळलेल्या ठिकाणाहून जनावरे, तसेच नागरिकांची ये-जा सुरू होती. सध्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले असल्याने वेगाने रेल्वे धावत आहेत. कोणताही धोका होऊ नये, यासाठी भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर सोमवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.









