हेस्कॉमकडून महिन्याभरापासून दुरुस्तीचे काम
बेळगाव : बेळगावमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव काळात विजेच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी हेस्कॉमकडून मागील महिन्याभरापासून दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. सध्या शहरातील गणेशमूर्तीची उंची वाढत असल्यामुळे मंडपांची उंचीही वाढली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याची गरज निर्माण झाली असून हेस्कॉमकडून वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे.
बेळगाव शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील 300 च्या आसपास गणेशमूर्ती या मंडपामध्ये तर उर्वरित गणेश मूर्ती मंदिरांमध्ये अथवा समुदाय भवनांमध्ये विराजमान होतात. सद्या गणेशोत्सवाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गणेशमूर्तीची उंचीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गल्ल्यांमध्ये काही ठिकाणी वीज वाहिन्यांची उंची अडचणीची ठरत आहे.
धोकादायक वीज वाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्स्फार्मर दुरुस्तीचे काम हेस्कॉमने हाती घेतले आहे. ज्या गणेशोत्सव मंडळाने धोकादायक वीज वाहिन्यांची तक्रार हेस्कॉमकडे केली आहे. अशा विभागांमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. सोमवारी रयत गल्ली, वडगाव परिसरात मंडपासाठी अडथळा ठरत असलेल्या अनेक वीज वाहिन्यांची दुरुस्ती हेस्कॉमकडून करण्यात आली.
वीजवाहिन्यांसंदर्भात हेस्कॉमला कळवा
मंडळांनी मागणी केल्याप्रमाणे वीज वाहिन्यांची उंची व तसेच धोकादायक वीजखांब हटविण्यात आले आहेत. आगमन सोहळा अथवा विसर्जनावेळी कोणत्याही मंडळाने वीज वाहिन्यांना स्पर्श करू नये, गणेशमूर्ती वीज वाहिन्याखालून जात नसतील तर हेस्कॉमशी संपर्क साधावा.
– मनोहर सुतार, (कार्यकारी अभियंता शहर)









