आराखड्याला मंजुरी, लवकरच कामाला होणार सुरुवात
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमींची दूरवस्था दूर करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती. त्याची दखल पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली असून याबाबत विशेष निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहरातील सदाशिवनगर, वडगाव, शहापूर यासह इतर परिसरात असलेल्या स्मशानभूमींची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यावर चर्चा झाली होती. नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्मशानभूमींची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांची बैठक पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली. त्यामध्येदेखील रवी साळुंखे यांनी हा मुद्दा उचलला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगून कृती आराखडा तयार केला आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीवर असलेले पत्रे पूर्णपणे खराब झाले आहेत. शहापूर तसेच वडगाव येथील स्मशानभूमींचीही दूरवस्था झाली आहे. स्मशानभूमींमध्ये पत्र्यांऐवजी आता अधिक उंचीवर स्लॅब घालण्याचे ठरविण्यात आले आहे. याचबरोबर तो परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक नेमण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. एकूणच स्मशानभूमींच्या दूरवस्थांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.









