वार्ताहर/सांबरा
सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनामुळे बेळगाव-सांबरा रस्त्याचे भाग्य उजळले आहे. सुवर्णसौध येथे सोमवार 9 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानिमित्त पूर्वतयारीच्या कामांना जोर आला आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व इतर अधिकाऱ्यांचे विमानानेच येणे जाणे असते. त्यामुळे साहजिकच सुवर्णसौधला जाण्यासाठी बेळगाव-सांबरा रस्त्याचा वापर होतो. मंत्र्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. दुभाजकांना रंग लावणे, झुडपे काढणे यासह इतर कामे सुरू आहेत. बेळगाव-सांबरा हा मुख्य रस्ता असूनही रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे वाहनचालकांना रोज तारेवरची कसरत करावी लागत होती. अधिवेशनामुळे का होईना रस्त्याची दुऊस्ती करण्यात येत आहे. मात्र तात्पुरता करण्यापेक्षा दर्जेदार रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.









