मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही, भाऊसाहेब बांदोडकर यांना आदरांजली
प्रतिनिधी/ पणजी
भाऊसाहेब बांदोडकर हे खऱ्या अर्थाने गोव्याचे भाग्यविधाते होते. कारण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत गोव्याची जडण-घडण करताना राज्यात शिक्षणाची गंगा वाहिली. राज्यातील ग्रामीण शिक्षणात स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे योगदान हे अतुलनीय होते. त्यांनी राज्यात प्राथमिक शिक्षणाचा पाया घातल्यानेच राज्याने शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. ग्रामीण शिक्षणात त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवून यंदाच्या वर्ष अखेरपर्यंत राज्यातील एकही शाळा दुरूस्तीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त मिरामार येथील भाऊसाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भाऊसाहेबांच्या स्मारकावर स्मृतिचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव पुनितकुमार गोएल, सुभाष वेलिंगकर व भाऊसाहेब बांदोडकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांची जरी 50 वी पुण्यतिथी असली तरी ते मार्गदर्शक ऊपाने आजही सर्वांसमोर आदर्श आहेत. त्यांनी शिक्षणात मोठे योगदान दिल्यानेच भावी पिढ्या घडल्या. राज्याचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला. आज त्यांची 50 वी पुण्यतिथी असल्याने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या व्याख्यानाचा समावेश असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भाऊसाहेब बांदोडकर स्मृतिस्थळाचे वर्षभरात नूतनीकरण
भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यांच्या काळात केलेला राज्याचा विकास भावी पिढीलाही ज्ञात व्हावा, यासाठी सरकारतर्फे पुढील वर्षभर विविध कार्यक्रम राबवून जनतेसमोर आणला जाईल. सरकारी शाळा सुरू करून राज्यात अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांची आठवण हे त्यांचे स्मृतिस्थळ आहे. गोव्याचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतिस्थळाचे नूतनीकरण येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
बांदोडकर स्मृतिचषक फुटबॉल स्पर्धा होणार
भाऊसाहेब बांदोडकर हे ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व होते. ते स्वत: फुटबॉलप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या 50 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येत्या तीन महिन्यात स्व. भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात येईल. ही स्पर्धा गोवा फुटबॉल असोसिएशनमार्फत आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.









