माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणात्मक बैठकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सरकारने पुनर्गठित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात सात सदस्य असतील. या मंडळात तिन्ही दलांचे निवृत्त अधिकारी समाविष्ट करण्यात आले आहेत. सरकारने माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
या मंडळात माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिणी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना यांच्यासह लष्करी सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलीस सेवेतील दोन निवृत्त सदस्यदेखील मंडळात आहेत. सात सदस्यांच्या मंडळात निवृत्त आयएफएस बी. व्यंकटेश वर्मा यांचाही समावेश आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती केली आहे. एनएसएबी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला वेळोवेळी माहिती देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी, पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर 23 एप्रिल रोजी सीसीएसची बैठक झाली होती.









