बेळगाव पं. स.चे 10 मतदारसंघ घटले : हरकती नोंदवण्यासाठी 15 दिवसांची मुदत : जि. पं. चा एक मतदारसंघ वाढला
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सभागृह बरखास्त होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही निवडणूक घेण्यासंदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय पक्षांसह राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणुकीच्या घोषणेकडे लागून राहिले आहे. अशातच पंचायत राज्य सीमा निर्णय आयोगाकडून पुनर्रचित मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव तालुका पंचायतीचे 45 मतदारसंघ होते. त्यातील 10 मतदारसंघ घटले असून आता 35 मतदारसंघ झाले आहेत. तसेच बेळगाव जिल्हा पंचायतीचा एक मतदारसंघ वाढला असून एकूण 91 मतदारसंघ झाले आहेत.

पंचायत राज्य सीमा निर्णय आयोगाकडून जि.पं., ता. पं. मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहे. व्याप्तीत येणाऱ्या गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील 304 तालुका पंचायत मतदारसंघ व 91 जिल्हा पंचायत मतदारसंघातील गावांची यादी व मतदारसंघाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सीमा निर्णय आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदारसंघाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी 19 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. आयोगाच्या बेंगळूर येथील कार्यालयाला पोस्टद्वारे अथवा https://rdpr.karnataka.gov.in/rdc/public/ या संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांच्या संख्येवरुन मतदारसंघ
निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या संख्येवरुन मतदारसंघ निश्चित करण्याची सूचना यापूर्वीच केली आहे. त्यानुसार सीमा आयोगाकडून तालुका पंचायत व जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्रचना करताना त्यामध्ये येणारी गावे व मतदारांच्या संख्येवरुन मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने सूचना केल्यानुसार प्रत्येक तालुका पंचायत मतदारसंघाच्या व्याप्तीत 12 हजार 500 ते 15 हजार मतदार रहावेत, अशी सूचना केली आहे. तर 11 तालुका पंचायत सदस्यांसाठी 1 लाख मतदार हवेत, असेही सूचीत केले आहे. या अनुषंगाने सीमा आयोगाकडून मतदारसंघ पुनर्रचित करुन यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच काही तालुक्यांमध्ये मतदारसंघ घटले असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या तालुक्यांच्या संख्येवरुनही मतदारसंघ कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंचायत राज्य सीमा निर्णय आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदारसंघांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यापूर्वीचे असलेले तालुका पंचायत मतदारसंघात मोठा बदल झाला आहे. तर जिल्हा पंचायत मतदारसंघात किरकोळ बदल झाले आहेत.









