कोल्हापूर :
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्यासाठी 25 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 23 रुपये अशी ही भाडेवाढ आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ अंमलबजावणीची सुरुवात झाली असली तरी या भाडेवाढीच्या अंमलबजावणीमध्ये मीटर पुन:प्रमाणिकरणाचा ( कॅलिब्रेशन) अडथळा आहे. यामुळे पुन:प्रमाणिकरण होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांकडून वाढवलेल्या दराप्रमाणे भाडेवाढ घेता येणार नाही.
शासनाने रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यात भाडेवाढीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र या निर्णयाला विलंब झाला. रिक्षा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ भाडेवाढ लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 27 फेब्रुवारी भाडेवाढ जाहीर केली. पहिल्या टप्यासाठी 25 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 23 रुपये अशी भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्चपासून सुरु झाली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढ जाहीर केली असली तरी त्यामध्ये रिक्षा मीटर पुन: प्रमाणीकरणाचा (कॅलिब्रेशन) अडथळा आहे. हे पुन: प्रमाणीकरण करण्यासाठी 1 मे पर्यंत मुदत आहे. यामुळे ज्या रिक्षांची मीटर पुन:प्रमाणीकरण आहे, त्यांनाच नवीन भाडेवाढीप्रमाणे प्रवाशांकडून पैसे घेता येणार आहेत. परिणामी भाडेवाढ अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी भाडेवाढीची अंमलबजावणी होऊ शकली नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.
- सॉफ्टवेअर बसवावे लागणार
रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत. यामुळे नवीन भाडेवाढीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित कंपन्यांकडून पुन:प्रमाणीकरण करावे लागणार आहे. पुन:प्रमाणीकरण करणाऱ्या कंपन्या पुण्यामध्ये आहेत. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे भाडेवाढीची त्वरित अंमलबजावणी शक्य नाही. एखाद्या रिक्षाचालकाने नवीन भाडेवाढीप्रमाणे भाडे घेतल्यास वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे रिक्षा चालक व प्रवाशामध्ये वादावादी होऊ नये म्हणून परिवहन कार्यालयाने पर्याय म्हणून टेरिफ कार्ड द्यावे.
बाबा इंदूलकर– कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटना
- सोमवारी कॅलिब्रेशन कंपन्या आणि रिक्षा व्यवसायिकांची बैठक
रिक्षा भाडेवाढीची अंमलबजावणी करण्यासाठी मीटर कॅलिब्रेशन आवश्यक आहे. यासाठी सोमवारी कॅलिब्रेशन करणारे आणि रिक्षा व्यावसायिकांची एकत्रिक बैठक आयोजित केली आहे. कॅलिब्रेशनसाठी दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकर कॅलिब्रेशन होण्यासाठी केंद्र संख्या वाढवण्यात येणार आहे. कॅलिब्रेशनध्ये बदल, आयटीआयमध्ये तपासणी आणि आरटीओकडून प्रत्यक्ष रस्त्यावर मीटरची तपासणी असे टप्पे आहेत.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी








