पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ‘तरुण भारत’ला दिली माहिती
बेळगाव : पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवरील अनुदानाचा वापर करून खासगी बोअरवेल भाडेतत्त्वावर घ्याव्यात, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, त्या टँकरला जीपीएस बसवावा, अशा सूचना आपण सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ‘तरुण भारत’ला दिली. ते म्हणाले, उन्हाळ्याला सुरुवात झाली असून हळूहळू पाणीटंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र त्यावर प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. जेथे पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र आहे तेथे खासगी बोअरवेल भाड्याने घेण्यास प्रारंभ करावा व टँकरद्वारेही पाणीपुरवठा करावा, असे आपण सांगितले आहे.
टँकर किती किलोमीटर धावला, याची नोंद ठेवण्यासाठी त्या टँकरला जीपीएस बसविण्याची सूचना केली आहे. बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे प्रथम तपासले पाहिजे त्यासाठी रॅपीड टेस्ट किटच्या माध्यमातून त्या पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी केली पाहिजे. पाणी पिण्यायोग्य असेल तरच त्याचा पुरवठा करावा, असे आपण स्पष्ट केले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाण्यासंदर्भात कोणतेही अनुदान नसले तरी आमच्याकडील ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व गोष्टींची सत्यता पडताळून बिल दिले जाईल. बेळगाव शहरातील जुन्या पाईप लाईन बदलण्याचीही सुरुवात झाली आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याची सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वाजवी पेक्षा जास्त दर आकारणाऱ्या टँकर चालकांवर कारवाई करण्याचा आदेशही आपण महापालिका आयुक्त व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले.









