मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या ज्येष्ठ भगिनी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
प्रख्यात लेखिका आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या ज्येष्ठ भगिनी गीता मेहता यांचे दिल्लीत निधन झाले आहे. निधनासमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांचे पती तसेच प्रकाशक सोनी मेहता यांचे पूर्वीच निधन झाले आहे.
प्रख्यात लेखिका, वृत्तचित्र फिल्म निर्मात्या आणि पत्रकार गीता मेहता या मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि व्यावसायिक प्रेम पटनायक यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या. गीता मेहता यांचा जन्म 1943 मध्ये दिल्लीत बीजू पटनायक आणि ज्ञान पटनायक यांच्या घरी झाला होता. गीता मेहता यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रख्यात लेखिका गीता मेहता यांच्या निधनाने दु:खी आहे. त्या बहुमुखी प्रतिभेच्या धनी होत्या, त्यांना स्वत:ची बुद्धिमत्ता तसेच फिल्म निर्मितीसोबत लेखनाबद्दलच्या ध्यासासाठी ओळखले जात होते. त्या निसर्ग आणि जलसंरक्षणासाठी आग्रही होत्या. दु:खाच्या या क्षणात नवीन पटनायक आणि पूर्ण परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करतो असे मोदींनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
कर्मा कोला, स्नेक अँड लॅडर्स, अ रिव्हर सूत्र, राज, द इटरनल गणेशा ही त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकाचा 13 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला असून 27 देशांमध्ये त्यांचे प्रकाशन करण्यात आले आहे. गीता मेहता यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, परंतु त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला नव्हता.