भारतीय आण्विक ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान : होमी भाभा यांच्यासोबत केले होते काम
वृत्तसंस्था/ उदगमंडलम
भारताच्या आण्विक कार्यक्रमांना दिशा प्रदान करणारे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे मंगळवारी वयाच्या 95 व्या वर्षी ऊटी येथे निधन झाले आहे. भारताच्या आण्विक कार्यक्रमांचे जनक महान वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. डॉ. भाभा यांच्यासोबत डॉ. श्रीनिवासन यांनी भारताचा पहिला आण्विक रिअॅक्टर ‘अप्सरा’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
1955 मध्ये डॉ. एम.आर. श्रीनिवासन हे मुंबई येथील भारतीय आण्विक संस्थेत सामील झाले, तेव्हा ते केवळ 25 वर्षांचे हेत. त्यादरम्यान भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक महान वैज्ञानिक होमी जहांगीर भाभा यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 24 जानेवारी 1966 रोजी डॉ. भाभा यांचे एका विमान दुर्घटनेत निधन झाले होते. मृत्यूपूर्वीच भाभा यांनी आगामी दशकांकरता भारताच्या आण्विक कार्यक्रमाची योजना आखली होती. डॉ. श्रीनिवासन यांनी भाभा यांच्या योजनेला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
श्रीनिवासन यांनी आण्विक ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच राष्ट्रीय महत्त्वाच अनेक पदांवर त्यांनी काम केले होते. यात अणुऊर्जा विभागात ऊर्जा प्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालकपद देखील सामील होते. 1987 मध्ये त्यांना आण्विक ऊर्जा आयोगाचा अध्यक्ष आणि आण्विक ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याचवर्षी ते भारतीय आण्विक ऊर्जा निगम लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वात 18 आण्विक ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यात आले. भारताच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमात उत्कृष्ट योगदानासाठी श्रीनिवासन यांना ‘पद्मविभूषण’ने गौरविण्यात आले होते.
भारताच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केलेले डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांच्या निधनामुळे अत्यंत दु:खी आहे. महत्त्वपूर्ण आण्विक प्रकल्पांच्या विकासात त्यांची उल्लेखनीय भूमिका ऊर्जा क्षेत्रात आमच्या आत्मनिर्भर होण्याचा आधार राहिली आहे. आण्विक ऊर्जा आयोगाच्या प्रेरक नेतृत्वासाठी त्यांचे स्मरण केले जाते. वैज्ञानिक प्रगती पुढे नेणे आणि अनेक युवा वैज्ञानिकांना मार्गदर्शन देण्यासाठी भारत त्यांचा नेहमीच आभारी राहिल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले आहेत.









