ग्राम. पं. सदस्य प्रशांत पाटलांनी साधले वाढदिवसाचे औचित्य
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून गावातील बसथांब्याचे नूतनीकरण करून एक विधायक उपक्रम राबविल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रशांत प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाला येणारी आर्थिक रक्कम अशा विधायक कार्यक्रमांना राबवतात. गावातील बसथांबा 30 वर्षापूर्वी बांधला होता. तो पूर्णपणे मोडकळीस आला होता. याची दखल घेऊन प्रशांत यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब व अन्य मित्रमंडळी यांच्या सहकार्याने 14-15 जणांना बसता येईल असे कठडे व फरशी बसविली अन् रंगरंगोटी करून बसथांब्याचे नूतनीकरण केले.
मार्कंडेय साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांनी छ. शिवमूर्तीचे पूजन केले. जि. पं. माजी सदस्य सरस्वती पाटील, ग्रा. पं. सदस्या रेखा पावशे, सुनिता जाधव, भाग्यश्री गौंडवाडकर यांनी विविध फलकांचे पूजन केले. सागर पाटील व कुस्ती कोच कृष्णा पाटील यांनी ध्वजारोहण केले. ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, पै. भाऊ पाटील, वैद्यकीय प्रतिनिधी रणजीत पाटील व ग्राम. पं. सदस्यांच्या हस्ते फीत कापून बसथांब्याचे उद्घाटन केले. या उपक्रमाबद्दल प्रशांत यांना सर्वांनी पुष्पगुच्छ दिले. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य केंप्पन्ना सनदी, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, विनायक कम्मार, महेश धामणेकर, यशोधन तुळसकर गावडे, कमिटीचे किरण पाटीलसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांनी केले. पशुवैद्य सुहास पाटील यांनी आभार मानले.









