दुचाकी-कार मालकांना मोठा आर्थिक फटका :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने जुन्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण शुल्क वाढवले आहे. 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण शुल्क दुप्पट करण्यात येत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. जुनी वाहने खरेदी करण्यापासून लोकांना परावृत्त करणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चांगल्या स्थितीत असलेल्या वाहनांचे नूतनीकरण करताना दुचाकी-कार मालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
नवीन नियमानुसार, 20 वर्षांपेक्षा जुन्या हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमडब्ल्यू) नूतनीकरण शुल्क आता 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 20 वर्षांपेक्षा जुन्या मोटारसायकलींसाठी नूतनीकरण शुल्क 1,000 रुपयांवरून 2,000 रुपये करण्यात आले आहे. तसेच तीनचाकी आणि चारचाकीसाठी नूतनीकरण शुल्क 3,500 रुपयांवरून 5,000 रुपये करण्यात आले आहे. परदेशातून आयात केलेल्या वाहनांबद्दल बोलायचे झाले तर, दुचाकी किंवा तीनचाकी वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क 20,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, चार किंवा अधिक चाके असलेल्या वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क 80,000 रुपये करण्यात आले आहे.
या बदलांसाठीच्या दुरुस्तीचा मसुदा मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये जारी केला होता. या मसुद्याला 21 ऑगस्ट रोजी अंतिम स्वरुप देण्यात आले. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटारसायकल, तीनचाकी आणि कारसाठी नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क वाढवले होते.
दिल्लीतील वाहनधारकांना अंतरिम दिलासा
या महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या मालकांना तात्पुरता दिलासा दिला होता. न्यायालयाने 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांच्या मालकांवर आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांच्या मालकांवर चार आठवड्यांसाठी कोणतीही कारवाई करू नये असे आदेश दिले होते. भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला होता. दिल्ली सरकारने जुन्या वाहनांवर बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या 2018 च्या आदेशाचा आढावा घेण्याची विनंती केली होती. सध्याच्या नियमांनुसार, दिल्लीत 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांचे आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांचे आयुमर्यादा संपते. साहजिकच अशा वाहनांचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
नवीन नूतनीकरण शुल्क तपशील
वाहन प्रकार सुधारित शुल्क मागील शुल्क
मोटारसायकल 2,000 1,000
तीनचाकी/चारचाकी 5,000 3,500
लाईट मोटर वाहन 10,000 5,000
आयात दुचाकी/तिचाकी 20,000 10,000
आयात चारचाकी 80,000 40,000
(टीप : दरांमध्ये जीएसटी समाविष्ट नसल्याने अंतिम देयक बदलू शकते.)









