वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनाच्या वास्तूतील काही महत्वाच्या सभागृहांचे नामांतर केंद्र सरकारने केले आहे. या वास्तूतील सर्वात महत्वाचे सभागृह मानल्या जाणाऱ्या ‘दरबार हॉल’चे नाव आता ‘गणतंत्र मंडप’ असे करण्यात आले असून अशोक हॉलचे नाव ‘अशोक मंडप’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध करुन ही नव्या नामकरणांची माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली आहे. दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार वितरणांचा कार्यक्रम केला जातो. हा जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. अशा सभागृहाचे नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत असावे, या हेतूने हे नवे नामकरण करण्यात आले आहे. अशोक हे नाव आहे तसेच ठेवण्यात आले आहे. मात्र हॉल या इंग्रजी शब्दाच्या स्थानी ‘मंडप’ हा भारतीय संस्कृतीशी निगडीत असणारा शब्द उपयोगात आणण्यात आला आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि राष्ट्रपती भवनाच्या व्यवस्थापनाकडून प्रसारित करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट केले गेले.









