केंद्र सरकार इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) सारख्या देशातील प्रमुख गुप्तचर संस्थांमध्ये नियुक्ती करताना मुस्लिमांविरुद्ध पक्षपाती असल्याचा आरोप लोकसभा खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. एका बातमीचा हवाला देऊन खासदार ओवेसी यांनी सत्ताधारी भाजप सरकार नेहमी मुस्लिमांकडून देशभक्तीचा पुरावा मागत आहे पण त्यांना कधीही स्वीकारत नसल्याचा आरोप केला.
आपल्या ट्विटर अकाउंटवर एका बातमीचा फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, “दशकांमध्ये पहिल्यांदाच, इंटेलिजन्स ब्युरोच्या वरिष्ठ नेतृत्वात एकही मुस्लिम अधिकारी असणार नाही. भाजप मुस्लिमांना ज्या संशयाने पाहतो त्याचे हे त्याचेच प्रतिबिंब आहे. IB आणि R&AW या विशेष संस्था बनल्या आहेत. तुम्ही नेहमीच मुस्लिमांकडून निष्ठेचा पुरावा मागत आहात, पण त्यांना समान नागरिक म्हणून कधीच स्वीकारत नाही.” असेही ओवैसी म्हणाले.
ओवेसी यांनी शेअर केलेला अहवाल एशियन एज या वृत्तपत्राचा असून यामध्ये, आयबीमध्ये दशकांनंतर महत्त्वाच्या पदावर कोणताही वरिष्ठ मुस्लिम आयपीएस अधिकारी नसल्याचे म्हटले आहे. या अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, शेवटचे विशेष संचालक पदावर असलेले वरिष्ठ मुस्लिम आयपीएस अधिकारी एस.ए. रिझवी होते. त्यांना सल्लागार म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर घेण्यात आले आहे. अलीकडच्या वर्षांत आयबीमध्ये मुस्लिम आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे असेही या बातमीमध्ये म्हटले आहे.









