सातारा :
शहरातील बॅनरला पालिकेने एक नियमावली तयार केली आहे. कुठे बॅनर लावायचा आणि कुठे लावायचा नाही याकरता पालिकेने तसा ठराव केला आहे. नगरपालिकेने काही शहरातील ठिकाणे ही नो बॅनर्स झोन निश्चित केलेले आहेत. असे असताना काही राजकीय पदाधिकारी, शहरातील काही संस्था या जाणीवपूर्वक तेथेच बँनर लावून आपला हट्ट पुरा करत असतात. पालिकेने अशा बॅनर लावणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे यांनी केली आहे.
सातारा शहरात दुभाजकामध्ये असलेल्या विद्युत पोलला चिटकून बॅनर लावायचे नाहीत. शिवतीर्थ परिसरात बॅनर लावायचा नाही. छ. शाहु महाराज चौकात बॅनर लावायचा नाही. हुतात्मा स्मारक परिसरात बॅनर लावायचा नाही, आदी ठिकाणे ही सातारा पालिकेने नो बॅनर झोन म्हणून निश्चित केली आहेत. तरीही काही फ्लेक्सबाज कार्यकर्ते ज्यांना फ्लेक्स लावल्याशिवाय करमत नाही, आपला फ्लेक्स लागला तरच आपण खरे नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते अशी आपली ओळख पुसेल असा त्यांचा समज असल्याने त्यांना बॅनर लावल्याशिवाय झोप लागत नाही अशी काही मंडळी नित्यनियमाने आपले बॅनर शहरात अशा ठिकाणी लावत असतात. त्यांच्या बॅनरवर पालिकेतून परवानगी घेतली त्याचा कोणताही पुरावा लावला जात नाही. राजकीय पाठबळाने एकाला पायाखाली आणि दुसऱ्याला डोक्याला घेणे बरोबर नाही, कारवाई ही सरसकट झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे यांनी केली आहे. दरम्यान, सातारा पालिकेचे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी आम्ही जे विनापरवाना बॅनर शहरात आहेत त्यावर दररोज कारवाई करतो. आजही कारवाई केली आहे. कोणाचेही फोन आले तरीही आम्ही नियमानुसार कारवाई करतो, असे त्यांनी सांगितले.








