दहशतवाद्याकडुन सर्वोच्च न्यायालयात अर्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी इस्लामिक स्टेटचा भारतातील कथित प्रमुख आणि दहशतवादी साकिब नाचनच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. नाचनने सर्वेच्च न्यायालयाकडे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) आणि इतरांवरील दहशतवादी संघटनेचा शिक्का हटविण्याची मागणी केली आहे.
या संघटनांना दहशतवादी घोषित करणाऱ्या दोन अधिसूचना रद्द करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी नाचनने स्वत:च्या याचिकेत केली आहे. नाचन हा दहशतवादी कृत्यांमध्ये सामील राहिला असून सध्या तो इस्लामिक स्टेटशी संबंध आणि भारतविरोधी कृत्यांप्रकरणी तुरुंगात आहे.
न्यायाधीश सूर्यकांत आणि उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली आहे. याचिकाकर्ता साकिब नाचन सध्या तिहार तुरुंगात असून तो सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिला. न्यायाधीश सूर्यकांत यांनी त्याला कायदेशीर मदत घेण्याचा प्रस्ताव दिला आणि अॅमिकस क्यूरीची मदत घेऊन स्वत:ची बाजू मांडण्याचा सल्ला दिला. अॅमिकस क्यूरीसोबत तुझ्या बैठकीची व्यवस्था करवित आहोत, त्यानंतर तुझ्या याचिकेवर विचार करू असे खंडपीठाने साकिबला उद्देशून म्हटले.
एनआयएने मागील वर्षी डिसेंबरमध्ये देशातील इस्लामिक स्टेटच्या मॉड्यूलचा खुलासा केला होता. साकिब नाचनला याप्रकरणी मुख्य आरोपी ठरविण्यात आले आहे. देशभरात इस्लामिक स्टेटच्या मॉड्यूलच्या संचालनाचा आणि युवांना दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. एनआयएने याप्रकरणी साकिब नाचनसोबत हसीब जुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बालेरे, सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुस, शगफ साफीक दिवकर, फिरोज दास्तगीर कुआरी समवेत अनेकांना आरोपी केले आहे.









