पंचायत स्तरावर यादी अपडेट करण्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची सूचना
बेंगळूर : मृत लाभार्थ्यांची यादी प्रत्येक महिन्यात पंचायत स्तरावर अपडेट करावी तसेच संबंधित बँकांना माहिती द्यावी. मृत लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकावीत, असा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिला. बेंगळूरमधील गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे सोमवारी मुख्यमंत्र्यांनी ‘पंचहमी’ (गॅरंटी योजना) योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी पंचायत स्तरावर प्रत्येक महिन्यात गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांची यादी अपडेट करावी. मृत लाभार्थ्यांना वगळून नव्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करावीत. अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेऊन कार्डे रद्द करावीत. हे काम पंचायत स्तरावर करावे. याबाबत असणाऱ्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. पाच गॅरंटी योजनेंतर्गत आतापर्यंत 97,813 कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 1.24 कोटी लाभार्थ्यांसाठी 50,005 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली.









