महापालिका आयुक्तांकडून पाहणी : शहरातील सर्व समस्या दूर करण्याची गणेशोत्सव मंडळे-नागरिकांची मागणी
बेळगाव : गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर गुरुवार दि. 28 रोजी अनंतचतुदर्शी आहे. त्यादिवशी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी काही ठिकाणी भेटी देऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. तातडीने दुरुस्तीची कामे करावीत, अशी सूचना त्यांनी केली असून या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी ख•s बुजविण्यास सुरुवात झाली तरी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरामध्ये 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ही सर्व मंडळे विसर्जन मिरवणूक काढून मूर्तीचे विसर्जन करत असतात. कपिलेश्वर येथील दोन तलावांबरोबरच अनगोळ, जुने बेळगाव, मजगाव, जक्कीनहोंडा येथील तलावांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्या तरी महापालिका आयुक्तांनी याबाबत तातडीने पाठपुरावा करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे. यापूर्वी महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांनीदेखील विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. त्यांनी दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र मार्गावरील अनेक अडथळे अजूनही दूर करण्यात आले नाहीत. तेव्हा तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. महापालिका आयुक्त स्वत: जाऊन पाहणी करत आहेत. लवकरच याबाबत आम्ही योग्य ते पाऊल उचलू, असे त्यांनी सांगितले. मात्र या कामाला गती देऊन तातडीने शहरातील सर्व समस्या दूर कराव्यात, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी केली आहे.









