आमदार राजू सेठ यांना नागरिकांचे निवेदन
बेळगाव : ढोरवाडा, चव्हाट गल्ली येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता, ड्रेनेज, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप यांची नेटकी व्यवस्था नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात हा भाग असूनही सुविधेपासून वंचित आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी येथील रहिवाशांनी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ व मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दाट लोकवस्ती असतानाही ढोरवाडा, चव्हाट गल्ली येथे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कीर्ती हॉटेलच्या मागील बाजूच्या गल्लीत रस्त्याची व्यवस्था नाही. ड्रेनेज, गटारी, नळ, पथदीप, जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्यामुळे नागरिकांना इतर गल्ल्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. याचा परिणाम येथील नागरिकांवर होत आहे. अनेक वेळा मागणी करूनही या परिसराकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
सुविधा पुरविण्याचे आश्वासन
आमदार राजू सेठ यांनी निवेदन स्वीकारून या परिसराला सर्व सुविधा पुरवू, असे आश्वासन दिले. यावेळी विशाल बिरसे, चरण धमोने, गजानन धमोने, संजय धमोने, दीपक धमोने यांच्यासह बेळगाव हिंदू ढोर समाज सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते.









