प्रतिनिधी /बेळगाव
क्लबरोड येथे जुनाट वृक्ष कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. त्यामुळे शहरातील धोकादायक व जुना वृक्ष हटविणे गरजेचे झाले आहे. गणेशपूर गल्ली शहापूर येथे अशाच प्रकारे एका इमारतीला लागून जुनाट वृक्ष असून, तो केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा वृक्ष तेथून काढावा, अशी मागणी गल्लीतील रहिवाशांकडून होत
आहे.
मागील 15 दिवसांमध्ये वारा, पावसामुळे अनेक जुनाट वृक्ष कोसळले. वृक्ष कोसळल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी तरी वन विभाग, महानगरपालिका व हेस्कॉम या तिन्ही विभागानी एकत्रितपणे धोकादायक वृक्ष हटविणे गरजेचे आहे. गणेशपूर गल्ली येथे मागील अनेक दिवसांपासून धोकादायक वृक्ष आहे. नागरिकांनी वनविभागाकडे हा वृक्ष काढण्यासाठी मागणी केली होती. परंतु हा वृक्ष आपल्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून महानगरपालिकेला कळवा असे सांगत आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे इमारतीचे नुकसान झाल्यानंतर अथवा एखाद्याला इजा झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.









