बिजगर्णी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बिजगर्णी येथील सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. उद्देशपूर्वक जागेवर अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण हटवून संबंधितावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी ग्रा. पं. व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले. बिजगर्णी येथील सर्व्हे क्र. 196 मध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. बिजगर्णी ग्राम सभेमध्ये ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सदस्यांच्या बैठकीत सदर जागा वसती योजनेसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सदर जागेवर गावातील नंदा कांबळे यांच्याकडून अतिक्रमण करून घर बांधण्यात आले आहे. ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमण केलेल्या जागेवरील बांधकाम हटवावे तसेच नंदा कांबळे यांचा मुलगा परशराम कांबळे यांच्याकडून उद्देशपूर्वक ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची सतावणूक करण्यात येत आहे. यामुळे विकास कामांवर परिणाम झाला आहे. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. यावेळी मनोहर बेळगावकर, पूजा सुतार, संदीप अष्टेकर, अॅड. नामदेव मोरे, चंद्रशेखर जाधव, शितल तारिहाळकर आदी उपस्थित होते.









