स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांची मागणी
बेळगाव : वाहतूक कोंडी नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलीस खात्याकडून किल्ला तलाव येथून सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन पूर्वीप्रमाणे वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार होनकेरी यांना नागरिकांतर्फे देण्यात आले. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रहदारी पोलिसांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ला येथील अशोक चौकातून गांधीनगरमार्गे सांबऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. सदर वाहन चालकांसाठी अशोक चौकातून बुडा कार्यालय येथून महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रोडने सांबरा रोडला ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहन धारकांना हा प्रवास जाचक ठरत आहे. यामध्ये इंधन व वेळेचा अपव्यय होत असून, या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या व्यापारी व पेट्रोल पंप चालकांसाठीही फटका बसत असून सदर मार्ग पूर्वीप्रमाणे वाहतुकीला खुला करून द्यावा. रस्त्यावर घालण्यात आलेली बॅरिकेड्स हटविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारक यांच्यासह या भागातील नागरिकांतून करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र माळगी, अनिल पाटील, बाबू संगोडी आदी उपस्थित होते.









