जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : रस्ताबंदमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे होताहेत हाल
बेळगाव : वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस खात्याकडून महानगरपालिकेच्या व्याप्तीमध्ये अनेक ठिकाणी बॅरिकेड्स घातले आहेत. कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलसमोर घालण्यात आलेले बॅरिकेड्स शालेय विद्यार्थी, नागरिक, वाहनधारकांना अडचणीचे ठरत असून सदर बॅरिकेड्स त्वरित हटविण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शंकरगौडा पाटील व नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले. महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असणाऱ्या कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेल येथे रस्त्यावरील दुभाजकावर बॅरिकेड्स घालून ये-जा करण्यास रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे कंग्राळ गल्ली, गेंधळी गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली, नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली, केळकर बाग यासह शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ये-जा करण्यास असणारा रस्ता बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आल्यामुळे वाहनांना इंधन घालण्यासाठी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फेरफटका मारावा लागत आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत सोयीचा असून शहरामध्ये ये-जा करण्यास महत्त्वाचे ठिकाण आहे. कॉलेज रोडवरून शहरात येणाऱ्या व शहरामधून कॉलेज रोडमार्गे बाहेर जाणाऱ्या वाहनधारकांसाठी उपयुक्त रस्ता असताना बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आल्याने मोठी अडचण होत आहे. परिणामी सदर भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला येणाऱ्या पालकांनाही अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन रस्ता पूर्वीप्रमाणे वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यावा, रस्त्यावर घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.









