जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची अधिकाऱ्यांना सूचना : मार्कंडेय नदी पुनऊज्जिवन करण्यासंदर्भात बैठक

बेळगाव : मार्कंडेय नदी पात्रातील गाळ आणि माती काढण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. मात्र या कामास गती देऊन या महिन्याच्या शेवटपर्यंत काम पूर्ण करावे. सदर काम एक आव्हान म्हणून स्वीकारावे आणि ग्राम पंचायतच्या माध्यमातून नदीतील गाळ काढण्याचे काम नीटपणे करावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी केली. जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी मार्कंडेय नदी पुनऊज्जिवन करण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते अधिकाऱ्यांना सूचना करत होते. पावसाळ्याची सुऊवात होण्यापूर्वी मार्कंडेय नदीचे पुनऊज्जिवनाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. नरेगा अंतर्गत काम सुरू असून ग्राम पंचायतच्यावतीने चांगले काम करा. सध्या हे काम संथगतीने सुरू असून याबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जर नदी स्वच्छ राहिली तर याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच अनेकांना होवू शकतो. त्यामुळे याचे गांभीर्य घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सदर काम हे स्वत:चे, गावचे व तालुक्याचे आहे, असे समजून करण्याची गरज आहे. तसेच या कामाकरिता केवळ नरेगा अंतर्गत कामगारांवर अवलंबून न राहता ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य याबरोबरच गावातील युवक मंडळे, स्व-साहाय्य संघ यांनाही समावून घेतल्यास सोयीचे ठरणार आहे. मार्कंडेय मिशनसाठी सर्वांनी सहकार्य करून नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मार्कंडेय नदी योजनेवर राज्य सरकार तसेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे पारदर्शकपणे काम करून ते वेळेवर पूर्ण करण्याकडे ग्राम पंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे. सदर कामात ट्रॅक्टर वगळता अन्य यंत्रांचा वापर करू नये, अशी सूचनाही सीईओंनी केली. वेळेवर या योजनेचे काम पूर्ण झाल्यास याचे सर्व श्रेय संबंधितांना मिळणार आहे. तसेच याचा फायदाही त्यांनाच मिळणार आहे. मात्र यामध्ये अयशस्वी झाल्यास त्रासही त्यांनाच होणार आहे. यासाठी हे काम आव्हान म्हणून स्वीकारा, असेही भोयर यांनी म्हटले. सध्या मार्कंडेय योजनेंतर्गत बिजगर्णी, बैलूर, तुरमुरी, बेकिनकेरे, उचगाव, बेनकनहळ्ळी, सुळगा (हिं), कडोली, काकती, केदनूर, बंबरगा, कंग्राळी के. एच., कंग्राळी बुद्रुक, अगसगा, आंबेवाडी, होनगा या गावातील नरेगा योजनेतील कामगारांना काम मिळू शकते. जर तसे झाल्यास रोजगार नसल्याच्या तक्रारी कमी होतील. मात्र सध्या नदीतील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे लागलीच या कामाला गती देण्याची गरज असून तातडीने नदीचे काम हाती घेवून ती स्वच्छ करण्यासाठी पाऊल उचला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर, साहाय्यक संचालक राजेंद्र मोरबद, जिल्हा कार्यक्रम समन्वयक बसवराज एन., जिल्हा आयईसी समन्वयक प्रमोदा गोडेकर यांच्यासह ग्राम पंचायतचे पीडीओ व इतर अधिकारी उपस्थित होते.









