व्यावसायिक-शेतकरी आक्रमक : शासनाकडून निर्बंध घातल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ
खानापूर : तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी तालुक्यातील वाळू आणि मातीसह इतर खनिज वाहतुकीवर निर्बंध घातले असून, अशा अवैद्य वाहतुकीवर कारवाई करून वाहने जप्त करण्याचे आदेश दोन दिवसापूर्वी संबंधित पोलीस ठाणे आणि वनविभागाला दिले होते. त्यामुळे तालुक्यातील वीट व वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. यावरील निर्बंध हटवावे, यासाठी गुरुवारी सकाळी 10 वाजता येथील विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत शेकडो व्यावसायिक उपस्थित होते. तालुक्यातील वीट आणि वाळू व्यावसायिकांची गुरुवारी येथील विश्रामधामात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, वीट व्यवसाय संघटनेचे अशोक नार्वेकर, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, गोपाळ पाटील, विठ्ठल पाटील, पांडुरंग सावंत, बाबासाहेब देसाईसह तालुक्यातील वाळू आणि वीट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीट व्यावसायिक गणपत पाटील, अशोक नार्वेकर, गोविंद जाधव यांनी वीट व्यवसायाबाबत सविस्तर माहिती सांगितली. व्यवसाय गेल्या शंभर वर्षापासून करण्यात येत असून यावर तालुक्यातील हजारो नागरिकांची उपजीविका अवलंबून आहे. दरवर्षी शासनाच्या नियमानुसारच वीट व्यवसाय करण्यात येतो. दंडही आकारण्यात येतो. मात्र शासनाकडून निर्बंध घालून कारवाई करण्याबाबत प्रथमच आदेश निघाल्याने तालुक्यातील हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी आमदारानी लक्ष घालून निर्बंध हटविण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी आमदारानी तहसीलदाराना बैठकीस्थळी बोलावून निर्बंधाच्या आदेशाबाबत सविस्तर माहिती घेऊन तहसीलदार गायकवाड यांना धारेवर धरले.. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्यातील वीट व्यवसाय हा परंपरागत असून, यावर ग्रामीण भागातील अर्थकारण अवलंबून आहे. वीट व्यवसायावर हजारो कुटुंबांची रोजीरोटी चालते. तसेच वीट व्यवसायामुळे पडीक जमीन माती काढून सुपीक करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनमानात बदल झालेला आहे.
वीट व्यवसायावर कधीही निर्बंध घालणार नाही – तहसीलदार
तसेच विटासाठी लागणारी माती आणि वाळू वाहतूक करताना पोलिसाना कोणत्याही प्रकारची लाच देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना जाब विचारताच आपण वीट व्यवसायावर कधीही निर्बंध घालणार नाही. असे आश्वासन यावेळी दिले.
…तर माझ्याशी गाठ आहे : आमदार विठ्ठल हलगेकर
वीट व्यवसाय हा शेतीला जोडधंदा असल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक साहाय्य मिळते. मात्र तहसीलदारानी राजकारणाच्या दबावाखाली विचार न करता निर्बंध घालण्याचे आणि वाहने जप्तचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे आयतेच फावले आहे. यावेळी पोलिसावर हल्लाबोल करताना आमदार म्हणाले, तालुक्यात गावोगावी गांजा, मटका, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. तसेच तालुक्यात चोरटांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामीण भागात दररोज चोऱ्या होत आहेत. अद्याप एकाही चोरीचा तपास पोलिसानी लावला नाही. मात्र तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. मात्र वीट व्यावसायिकांनी कोणाचीही तमा न बाळगता वीट व्यवसायाला लागणारी माती आणि वाळूची वाहतूक करावी. जर पोलीस किंवा प्रशासनाकडून काही त्रास झाल्यास माझ्याशी गाठ आहे. असा सज्जड दमही आमदारानी यावेळी बोलताना दिला.









