बैठकीत व्यापाऱ्यांची आमदार सेठ यांच्याकडे मागणी : फेरीवाले-बैठ्या विक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न
बेळगाव : गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांना गटारीपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात यावी, दुकानाबाहेरील रस्त्यावर असलेले अडथळे दूर करण्यासह पोटभाडेकरूंना हटविण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमदार राजू सेठ यांच्याकडे केली. व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आमदार सेठ यांनी पोलिसांना सूचना केल्या. रविवार दि. 16 रोजी गणपत गल्लीत आमदार राजू सेठ यांच्यासोबत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम, उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते. गणपत गल्लीत बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून रस्त्यावर थांबून व्यवसाय केला जात आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून गणपत गल्लीसह मुख्य बाजारपेठेतील फेरीवाले आणि बैठ्या विक्रेत्यांना हटवून शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
व्यापाऱ्यांनी आमदारासमोर मांडल्या विविध समस्या
गत आठवड्यात मंगळवारी गणपत गल्लीत मनपाचे अतिक्रमण हटाव पथक आणि पोलीस जेसीबीसह दाखल झाले. दुकानाबाहेर तीन फुटाच्या अंतरात ऊन आणि पावसापासून आडोसा निर्माण करण्यासाठी घालण्यात आलेले झंप व इतर साहित्य हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे या कारवाईला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. ही माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांचे म्हणणे एकून घेत बाजारपेठेत पाहणी केली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी आमदार राजू सेठ यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रविवारी आमदार सेठ यांनी गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी विविध समस्या आमदारासमोर मांडल्या.
पोटभाडेकरूंना हटविण्याची गरज
काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरील जागा पोटभाडेकरूंना दिली आहे. अशा भाडेकरुंना हटविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर गल्लीतील अडथळे दूर केल्यास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. त्याचबरोबर दुकानाबाहेरील गटारीपर्यंत व्यापाऱ्यांना साहित्य थाटण्यास मज्जाव करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे आमदार सेठ यांनी वाहतूक पोलिसांना सूचना केल्या. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पावले, विजय आचमनी, रमेश साळवणकर, किशोर बाळेकुंद्री, मकरंद केशकामत, राजकुमार तिलानी, अमिन सेठ, फईम बंदुकवाला यांच्यासह गणपत गल्लीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही बाजूला पार्किंग सुरू करण्याची मागणी
गणपत गल्ली ही शहरातील मुख्य बाजारपेठ असून, याठिकाणी मोठ्या संख्येने ग्राहक येत असतात. मात्र ग्राहकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम व्यापारावर होत असून ग्राहकांना दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे गणपत गल्लीतील सर्व अडथळे दूर करू सम-विषम पार्किंग ऐवजी दोन्ही बाजूला पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.









