राज्यातील हिंदू संघटनांची मागणी : पोलीस खात्याला निवेदन सादर
पणजी : जयश्रीराम गौसवर्धन केंद्र वाळपईचे प्रमुख तसेच विविध सामाजीक कार्यात सक्रीयपणे काम करणारे हनुमंत परब यांना पोलीस खात्याने विनाकारण हिस्ट्री शीटर यादीत घालून ते एक प्रख्यात गुंड असल्याचे चित्र समाजासमोर मांडले आहे. पोलीस खात्याने कोणत्या आधारे हे कृत्य केले आहे याची आम्हाला कल्पना नाही मात्र हनुमंत परब यांना हिस्ट्री शीटर यादीतून वगळा अशी मागणी करणारे निवेदन राज्यातील विविध हिंदू संघटनांनी पोलीस मुख्यालयात सादर केले आहे. राज्यातील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी काल मंगळवारी पेलीस मुख्यालयात आले होते. यात कमलेश बांदेकर, जयेश थळी, अमृत सिंग, शैलेंद्र वेलींगकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार हनुमंत परब यांना 12 एप्रिल रोजी जी -20 बैठकीदरम्यान गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या संशयावरून नोटीस पाठवण्यात आली होती. 14 एप्रिल रोजी हनुमंत परब पोलीस ठाण्यात पोहोचले असता, त्यांचे नाव हिस्ट्री शीटर लिस्टमध्ये असल्याचे सांगण्यात आले. एकूणच हीप्रक्रीया अत्यंत धक्कादायक आहे. समाजातील प्रमुख सदस्य म्हणून हनुमंत परब यांची ओळख आहे असे निवेदनात म्हटले आहे.
हनुमंत परब हे 2008 पासून जयश्रीराम गौसवर्धन केंद्र वाळपईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 2011 पासून गोवंश रक्षा अभियान, गोवाचे अध्यक्ष आहेत. 2012 पासून पिसुर्ले शेतकरी समितीचे अध्यक्ष आहेत. 20005 पासून पिसुर्ले अर्बनचे संस्थापक सदस्य आणि संचालक आहेत. 2018 पासून गोवा राज्य प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य आहेत. ते एसपीसीए व्यवस्थापकीय समितीचे 2021 सदस्य आहेत. त्यांनी केवळ समाजासाठी कार्य केले आहे. समाजासाठी कार्य करणारी व्यक्ती हिस्ट्री शिटर असू शकते काय असा निवेदनात उपस्थित केला आहे. आम्ही विविध संस्थांचे खाली स्वाक्षरी केलेले सदस्य श्री हनुमंत परब यांना जवळून ओळखतो आणि त्यांच्यासोबत काम केले आहे. समाजात त्यांची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असून ही अत्यंत दुर्दैवी कृती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेल्या सर्व चांगल्या कामाचा हा अपमान आहे. आम्ही पोलीस खात्याला निवेदना द्वासे आवाहन करतो की, हनुमंत परब यांचे नाव हिस्ट्री शिटर यादीतून काढून टाका आणि त्याचा अभिमान व प्रतिष्ठा पुनर्संचयित करा. अशी मागणी विविध हिंदू संघटनानी पोलीस खात्याला दिलेल्या निवेदनात केली आहे.









