म. ए. युवा समिती सीमाभागाचे पालकमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक कार्यालयातील फलक कन्नडसह मराठी भाषेतून असणे अनिवार्य आहे. परंतु राज्य सरकारकडून कन्नडसक्तीच्या नावाखाली महानगरपालिकेतील मराठी फलक हटविले असून त्यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. कन्नडसक्ती करणे अयोग्य असून सीमाभाग वगळता कर्नाटकातील इतर भागांमध्ये ती लागू करावी, अशी मागणी म. ए. युवा समिती सीमाभागतर्फे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.
युवा समिती सीमाभागच्यावतीने रविवारी पालकमंत्री जारकीहोळी यांची गोकाक येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. सीमाभागात होत असलेल्या कन्नडसक्तीला पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी, असे निवेदन सादर केले. जर कन्नडसक्ती अशीच चालू राहिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही व याचे पडसाद दोन राज्यांमध्ये उमटतील, असे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजित मजुकर, अशोक घगवे, नारायण मुचंडीकर, भागोजीराव पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, रंजित हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर, सचिन दळवी, गजानन शहापूरकर, सूरज कणबरकर, प्रवीण गौडर व कार्यकर्ते उपस्थित होते.









