स्थानिक नागरिकांचे नगरपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे येथील हनुमाननगर येथे कचरा फेकून देण्यात येत आहे. त्या ठिकाणी कचरा तसाच साचून आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर मोकाट कुत्रीही ठाण मांडून असून ही कुत्री अचानकपणे माणसांवर हल्ला करत आहेत. तेंव्हा येथील कचऱ्याचा ढीग तातडीने हटवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मच्छे नगरपंचायतचे अधिकारी शिवकुमार यांना निवेदन देऊन केली आहे.
मच्छे गावचा विस्तार वाढत चालला आहे. मच्छे ग्राम पंचायत सध्या नगरपंचातमध्ये वर्ग करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही सोयी-सुविधा या गावामध्ये नाहीत. कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जात नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. हनुमाननगर परिसरात तर संपूर्ण गावचा कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

15 दिवसात कचरा न हटविल्यास आंदोलन
हनुमाननगर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा फेकून देण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान, या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. अनेकजण आजारी पडत असून जाणूनबुजून याकडे कचरा फेकून देण्यात येत आहे. विशेष करून लहान मुलांना याचा मोठा त्रास होत असून याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्याच्या ढिगामुळे रोगराई वाढली आहे. साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. तेंव्हा येत्या 15 दिवसांत येथील कचरा हटविला नाहीतर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.









