मनपाचा अतिक्रमितांना इशारा : दुसऱ्या दिवशीही कारवाई
बेळगाव : महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या लक्ष्मी मार्केटचा ताबा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी तेथील एक बेकायदेशीर शेड हटविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सार्वजनिक विहिरीभोवती थाटण्यात आलेले बिर्याणी सेंटर हटविण्यात आले. बुधवारपर्यंत लक्ष्मी मार्केटमधील साहित्य हटविण्यात यावे, अन्यथा जेसीबी चालविण्यात येईल, असा इशारा मनपा अधिकाऱ्यांनी तेथील अतिक्रमितांना दिला आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे 5 एकर जागेत मोडका बाजार भरवला जात आहे. ही जागा लक्ष्मी मार्केट म्हणून ओळखली जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने त्याठिकाणी अनेक जणांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण करून वेगवेगळे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर जुगार आणि मटका अड्डे चालविण्यासाठी शेडदेखील घालण्यात आले होते. त्याठिकाणी काळेधंदे सुरू ठेवण्यात आले होते. पोलिसांनीदेखील कारवाईकडे कानाडोळा केला होता. या जागेचा पार्किंग किंवा अन्य कारणासाठी योग्य वापर केल्यास महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल.
पण जागेचा ताबा घेण्यासह त्याचा योग्यरित्या वापर करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. महापालिकेतील विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांच्या प्रभागात हा परिसर येतो. त्यामुळे लक्ष्मी मार्केटच्या जागेचा योग्य वापर करण्यासह तेथील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी मुज्जमिल डोणी यांनी महापालिकेकडे केली होती. याची दखल घेत सोमवारी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी लक्ष्मी मार्केटमध्ये घालण्यात आलेले बेकायदा शेड हटविले होते. यानंतर मंगळवारी मार्केट विभागाचे महसूल अधिकारी अनिल बोरगावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील आणखी एक शेड हटविण्यासह सार्वजनिक विहिरीभोवती थाटण्यात आलेले बिर्याणी सेंटरदेखील हटविले. त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या इतरांनाही बुधवारपर्यंत आपले साहित्य काढून घ्यावे, अन्यथा जेसीबी चालविण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. लक्ष्मी मार्केटची जागा ताब्यात घेतल्यानंतर त्याठिकाणी महापालिकेचा फलक लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर जागेचा सदुपयोग व्हावा, यासाठी पार्किंग व्यवस्था किंवा व्यापार संकुल उभारले जावे, अशी मागणी केली जात आहे.









