रत्नागिरी प्रतिनिधी
गावातील विकास कामे करताना एकमेकांमधील मतभेद दूर ठेवून ग्रामविकासाकरिता एकत्र या ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा परिषद कळझोंडी शाळा क्र 2 येथे दोन नवीन खोल्यांचे बांधकाम करण्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती मेघना पाष्टे, सरपंच दीप्ती कीर, तुषार साळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जी कामे सरपंचांच्या माध्यमातून सर्व विकासकामे करण्याची जबाबदारी आपली असून मौजे कळझुंडी मधील एकही विकास काम प्रलंबित राहणार नाही, तसेच कळझोंडी सारख्या छोट्या गावाच्या विकासासाठी सुमारे साडे तीन कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही ते म्हणाले. गावातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला बचत गटांसाठी मौजे वाटद येथे विक्री केंद्र उभारण्यात येणार असून या विक्री केंद्राचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच गावामध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास व्यायाम शाळा उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
मौजे कळझुंडी नंतर पालकमंत्र्यांनी गडनरळ, कोळीसरे ,वैद्यलावगन येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर वरील गावांच्या विकासासाठी सुमारे २ कोटी ५० लाख एवढ्या रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी सामंत यांनी या दौऱ्यादरम्यान प्रारंभी खालगाव ग्रामपंचायतला भेट देऊन तेथे बांधण्यात येणाऱ्या बचत गट इमारतीच्या जागेची पाहणी केली व इमारती बांधकामासाठी वीस लाख रुपये निधी देणार असल्याची घोषणा केली .याप्रसंगी संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .