व्यावसायिकांची मागणी : बाजारपेठेत धोका
बेळगाव : शहरात धोकादायक झाडे आणि फांद्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. सतत वर्दळ असणाऱ्या गणपत गल्लीत झाडाच्या फांद्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे त्या तातडीने हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. रस्त्याशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला लागून गेल्या आहेत. दरम्यान पावसाळ्यात शॉर्टसर्किटचे प्रकार वाढू लागले आहेत. फांद्या वीजवाहिन्यांमध्ये गुरफटल्या आहेत. त्यामुळे आजूबाजुच्या व्यावसायिकांना धोका निर्माण होऊ लागला आहे. शिवाय रहदारीदेखील धोकादायक ठरू लागली आहे. मनपा आणि वनखात्याने या झाडाचा सर्व्हे करून फांद्या हटवाव्यात, अशी मागणी होत आहे. दुकानाच्या समोर असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर झुकल्या आहेत. त्यामुळे वादळी पावसात धोका निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान, मुख्य बाजारपेठ असल्याने हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र झाडाच्या धोकादायक फांद्या पादचाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरू लागल्या आहेत.









