नागरिक-वाहनधारकांची मागणी : वृक्ष कोसळून मालमत्तांचे होतेय नुकसान
बेळगाव : शहर आणि शहराबाहेरील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आयुर्मान संपलेल्या धोकादायक झाडांची संख्या अधिक आहे. संभाव्य धोका ओळखून ही झाडे हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वनखात्यामार्फत लाखो रोपांची लागवड केली जाते. मात्र काही झाडे आणि फांद्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. वादळी पावसात ती भुईसपाट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान होते. यासाठी संभाव्य धोका ओळखून मनपा आणि वनखात्याने अशी झाडे हटविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहरात धोकादायक झाडांची संख्या अधिक आहे. अशा झाडांमुळे गतवर्षी क्लब रोडवरील वृक्ष कोसळून एका निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. शिवाय अलीकडे पावसाळ्यात झाडे कोसळून जीवितहानी आणि इतर हानीदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. हे टाळण्यासाठी धोकादायक वृक्षांचा सर्व्हे होणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात शेकडो झाडे कोसळतात. काही झाडे मुळापासून तर काही झाडांच्या फांद्यादेखील कलंडतात. त्यामुळे वनखात्याला फटका बसतो. झाडे कोसळून हेस्कॉमचे विद्युतखांब आणि विद्युततारांचेही नुकसान होते. काही ठिकाणी खासगी मालमत्तेबरोबरच घरांची कौले, पत्रे आणि साहित्याचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी धोकादायक झाडे वेळीच हटविणे गरजेचे आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळेझाडांची मुळे कमकुवत
शहरात झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे झाडांची मुळे तुटली आहेत. गटारी, रस्ते, पेव्हर्स, ड्रेनेज लाईन आणि इतर विकासकामांच्या खोदाईमुळे झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत. अशी झाडे पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. आधार नाहीसा झाल्याने अशी झाडे कोसळण्याचे प्रकार अधिक घडतात. त्यामुळे आशा झाडांचा धोका ओळखून वेळीच हटवावीत, अशी मागणीही स्थानिक नागरिकांतून होऊ लागली आहे. शहराबरोबर विविध मार्गांवर झाडांच्या फांद्या रस्त्यावर एका बाजूला कलंडलेल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीला धोकादायक आहेत. विशेषत: विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्यास धोका उद्भवतो. त्यामुळे रस्त्यावरील धोकादायक फांद्यांची छाटणी करणे आवश्यक आहे. खासगी आणि वैयक्तिक मालमत्तेमध्ये धोकादायक झाडे असल्यास संबंधित नागरिकांनी वनखात्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दरम्यान झाडांची पाहणी करून मनपामार्फत अशी झाडे हटविली जातात.
वृक्ष हटविण्यासाठी मनपाचे सहकार्य अत्यंत गरजेचे
शहरातील धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धोकादायक झाडांची मनपानेदेखील कल्पना देणे आवश्यक आहे.
– मल्लिनाथ कुसनाळ, (एसीएफ वनखाते)








