वाहनधारकांची मागणी : बोकनूर क्रॉसजवळ 25 ते 30 वर्षापूर्वीची जुनाट झाडे
वार्ताहर /तुडये
बेळगाव-राकसकोप रस्त्यातील वडरांगी ते बेळगुंदी दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला (दुतर्फा) असलेल्या जीर्ण आणि जुनाट आकेशा व अन्य जातीच्या झाडांच्या धोकादायक फांद्या त्वरित तोडाव्यात, अशी मागणी परिसरातील वाहनधारकांतून होत आहे. बोकनूर क्रॉसजवळची झाडे 25 ते 30 वर्षापूर्वीची जुनाट आहेत. वनविभागाच्या कायद्यानुसार आकेशा जातीची झाडे 12 वर्षानंतर मुळातून तोडण्यात येतात. वनातील झाडे तोडण्याची परवानगी खुद्द वनविभाग देतो. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर डोकावतात. दरवर्षी वादळ, वाऱ्यात व पावसाळ्यात या झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने बराचवेळ वाहतूक ठप्प होते. रस्त्यातील या झाडांच्या फांद्यांमुळे वाहतूक धोक्याची बनली आहे. मागील आठवड्यात वळीव पावसात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दोनवेळा फांद्या कोसळल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. वनविभागाने या रस्त्यातील धोकादायक फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









