मनपाचा ग्रा. पं., नगरपंचायतींना इशारा : जनावर मालकांनाही दिली ताकीद
बेळगाव : शहरालगतच्या ग्रा. पं. च्या हद्दीत मुख्य रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने ठिकठिकाणी ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत आहे. मुख्य रस्त्यावरील ब्लॅकस्पॉट हटविण्यासह कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे अन्यथा कचऱ्याची उचल केली जाणार नाही. तसेच यापुढे मोकाट जनावरे शहरात सोडल्यास मालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्यावतीने शहरालगतच्या 11 ग्रा. पं., नगर पंचायती, जनावर मालक, कॅन्टोन्मेंट, विमानतळ प्राधिकरण यांना देण्यात आला.
शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात महापालिकेच्यावतीने शहरालगतच्या ग्रा म पंचायती, नगरपंचायती, मोकाट जनावरांचे मालक, सांबरा विमानतळ प्राधिकरण, कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे होते. व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, मनपा आयुक्त शुभा बी., पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी होते.
शहरातील कचऱ्याची उचल करण्यासह योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर ओला, सुका आणि प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरणसुद्धा केले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शहरातील कचरा समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे. मात्र शहरालगतच्या ग्रा. पं. च्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून मुख्य रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ब्लॅकस्पॉट निर्माण झाले आहेत. विशेष करून बेळगाव-बागलकोट रोडवरील सांबरा ग्रा. पं. च्या हद्दीतील रोडवर कचरा टाकला जात आहे. या रस्त्यावरून सांबरा विमानतळाकडे जाणाऱ्या महनीय व्यक्तींची कायम वर्दळ असते. त्याचबरोबर कंग्राळी खुर्द ग्रा. पं. च्या हद्दीतील रहिवाशांकडून एपीएमसी रोडवर, बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून पाईपलाईन रोडवर, मच्छे व पिरनवाडी नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून बेळगाव-खानापूर रोडवर कचरा टाकला जात आहे.
यासह अन्य ग्रा. पं. च्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांकडून देखील मुख्य रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. यामुळे बेळगाव महानगरपालिकेची बदनामी होत आहे. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ग्रा. पं. नी कारवाई करावी. कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याची त्याठिकाणी नियुक्ती करावी. कचरा टाकताना त्याचे वर्गीकरण करावे अन्यथा कचऱ्याची उचल करण्यात येणार नाही, असे यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर ग्रा. पं. व नगर पंचायतीच्या पीडीओंनी यापुढे महापालिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेणार असल्याचे सांगितले. तसेच दर महिन्यातून एकदा याबाबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा करावी, अशी मागणी केली.
मोकाट जनावरे शहरात सोडू नयेत
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या काही जनावर मालकांकडून शहरात गायी, म्हशी सोडल्या जात आहेत. त्यामुळे ही जनावरे मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशी जनावरे पकडण्यासाठी गेले असता संबंधित मालक पुढे येतात. त्यामुळे यापुढे मोकाट जनावरे कोणत्याही परिस्थितीत शहरात सोडू नयेत अन्यथा कचरा टाकण्यासह जनावरे सोडणाऱ्यांवर देखील महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.









