नागरिक, जनावरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : पहिल्या रेल्वेगेटजवळ 2014 पासून बॅरिकेड्स लावून संपर्क रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण-उत्तर टिळकवाडीचा संपर्क तुटला आहे. तसेच नागरिकांना आणि पाळीव जनावरांना याचा त्रास होत आहे. बॅरिकेड्समुळे येथील व्यापार थंडावला आहे. तेव्हा हे बॅरिकेड्स काढावेत व येथे सिग्नल्स बसवावेत, अशा आशयाचे निवेदन बॅरिकेड्स हटाव मोहिमेचे प्रमुख सुभाष घोलप व अन्य कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना दिले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या अकरा वर्षांपासून या प्रश्नाबाबत आपण गल्ली ते दिल्लीपर्यंत संपर्क साधला आहे. आयुक्तांनी पहिल्या रेल्वेगेटवरील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी याची नोंद घेऊन बॅरिकेड्स व सिग्नलची समस्या बेंगळूर येथील वाहतूक कार्यालयाला कळवून पोलीस बंदोबस्तही करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी दीपक गवंडळकर, मनोहर रोकडे, अजित नाईक व अनंत पाटील उपस्थित होते.









