सातारा :
औरंगजेबाची कबर उखडून करा, अशा घोषणा देत शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने काढून सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मोर्चेकऱ्यांपेक्षा पोलिसांची मोठी संख्या होती. त्याबाबत आंदोलनकर्त्यांना विचारणा केली असता, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गाढवे यांनी ऐनवेळी सांगावा दिला असल्याचे सांगितले.
औरंगजेब की कबर खुदेगी, शंभूराजे की धरतीपर, औरंगजेब की कबर खुदेगी, शिवछत्रपती की धरतीपर, एक धक्का और दो, औरंग्या की कबर तोड दो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के सम्मान में, बजरंग दल मैदान में, छत्रपती के सम्मान में, बजरंग दल मैदान मे, बजरंग दल मैदान में, औरंग्या की कबर आसमान में, औरंग्याची कबर उखडून काढा, उखडून काढा, औरंग्या के पिल्लो से, हम लढेंगे हम लढेंगे, देश की रक्षा कौन करेगा, बजरंग दल बजरंग दल, धर्म की रक्षा कौन करेगा, बजरंग दल बजरंग दल, जयकारा वीर बजरंगी, अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
दरम्यान, त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष विजय गाढवे, जितेंद्र वाडकर, दीपक घाडगे, दीपक दीक्षित, उमेश कोरडे, अतुल शालगर, रवी ताथवडेकर, आर. एस. जावलीकर, संतोष प्रभुणे, सौ. अस्मिता योगेश लाड, उर्मिला पवार, लता सारडा यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, उझबेकी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज व्रुरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगरात आहे. वास्तविक औरंगजेब हा अहिल्यानगर येथे मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे पुरण्यात आला. त्याच ठिकाणी त्याची कबर करण्यात आली. याच औरंगजेबाने शिख गुरु तेगबहादूर यांची क्रूर हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही, अशी भयंकर यातनामय हत्या त्याने केली. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले. मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिराचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच यानेच फोडले. त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गडावर हल्ला केला. हजारो हिंदूच्या प्रेताच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूची भयानक अशी कत्तल केली. अशा क्रूरकर्मा आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे एक प्रतिक आहे. ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, ते न झाल्यास पूर्व सुचित करुन विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दल हिंदू समाजाबरोबर छ. संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कुच करतील असा इशारा दिला.
- पोलिसांचाच मोठा बंदोबस्त
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गाढवे यांनी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोर्चाची पूर्वकल्पना दिली नाही. कोणतेही नियोजन केले नाही. काही लोकांना निरोप आयत्यावेळी मिळाले. त्यांना कळताच ते तत्काळ शिवतीर्थावर पोहोचले. त्यामुळे पोलिसांची संख्या जास्त आणि मोर्चेकऱ्यांची कमी असे चित्र दिसत होते.








