बेळगाव : गणेश विसर्जनानंतर कपिलेश्वर तलावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीमूर्तीसाठी वापरलेले पाठ तसेच लोखंडी बार त्याच ठिकाणी सोडून दिले होते. त्यामुळे दोन्ही तलावामध्ये मोठा साठा झाला होता. तो काढण्यासाठी महानगरपालिकेने एका खासगी ठेकेदाराला ठेका दिला असून शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने लोखंडी बार तसेच पाठ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती भव्य असतात. त्यासाठी लोखंडी बार आणि मोठा पाठ वापरला जातो. गणेशमूर्ती विसर्जन करताना क्रेनच्या साहाय्याने तलावामध्ये ती मूर्ती सोडली जाते.
मात्र लवकर त्या मूर्तीपासून लोखंडी बार आणि पाठ विभक्त करणे अशक्य असते. काही गणेशोत्सव मंडळे मोठ्या कष्टाने लोखंडी बार आणि पाठ काढत असतात. मात्र बहुसंख्य मंडळे मूर्तीबरोबरच पाठ आणि लोखंडी बार तसेच सोडून जातात. त्यामुळे तलावामध्ये मूर्तीबरोबरच बारही तसेच पडून राहतात. आता हे दोन्ही तलाव स्वच्छ करायचे असतात. त्यासाठी प्रथम लोखंडी बार आणि पाठ हलविणे गरजेचे आहे. हे सर्व बाहेर काढणे फार कठीण असते. त्यामुळे यावर्षी त्याचा टेंडरच एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे काही तरुणांसह कर्मचारी हे काम शुक्रवारी करत होते. मोठ्या प्रमाणात लोखंडी बार तसेच इतर साहित्य काढण्यात येत होते.









