महापौर-वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून शहापूर स्मशानभूमीतील झाडांचीही पाहणी
बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती हटविण्यात यावीत, अशी सूचना यापूर्वीच महापालिकेकडून वनखात्याला करण्यात आली होती. त्यानुसार झाडांचा सर्व्हे करण्यात आला असून धोकादायक झाडे व फांद्या हटविण्याचे काम वनखात्याकडून सुरू झाले आहे. सोमवारी महापौर मंगेश पवार व वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन त्या ठिकाणच्या धोकादायक झाडांची पाहणी केली. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झाडे उन्मळून पडण्यासह फांद्या मोडून पडत असल्याने अनेकांचे बळीही गेले आहेत. हेस्कॉमचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर चारचाकी व दुचाकी वाहनांचेही यामध्ये नुकसान होत आहे. शहर व उपनगरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून ती हटविण्यात आलेली नाहीत. पावसाळ्यात अशा झाडांपासून धोका निर्माण होऊ शकतो.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती हटविण्यात यावीत, अशी सूचना यापूर्वीच मनपावतीने वन खात्याला करण्यात आली होती. त्यानुसार वनखात्याने धोकादायक झाडांचा सर्व्हे केला आहे. जुनाट व धोकादायक स्थितीत असलेली, तसेच ज्या झाडांच्या बुंध्यांना आग लावण्यात आली आहे, ती झाडे मुळापासून काढण्यात येणार आहेत. धोकादायक फांद्यादेखील हटविण्याचे काम सुरू झाले आहे. अनगोळ, भाग्यनगर परिसरातील झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व 58 प्रभागांमध्ये असलेली धोकादायक झाडे हटविण्यासह फांद्या तोडल्या जाणार आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी शहापूर स्मशानभूमी येथील धोकादायक झाड शवदाहिनीवरील निवारा शेडवर कोसळल्याने शेडचे नुकसान झाले आहे. सदर शेड अद्याप महापालिकेकडून उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे शेड उभारण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शेड उभारण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेल्या धोकादायक झाडांची पाहणी करून ती हटविण्यात यावीत, यासाठी सोमवारी स्वत: महापौर मंगेश पवार यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह शहापूर स्मशानभूमीला भेट दिली. धोकादायक झाडे हटविण्यात आल्यानंतर शेड उभारले जाणार आहे.









