अध्याय सत्ताविसावा
भगवंताना उद्धवाने अत्यंत विनम्रभावाने विनंती केली की, आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारा पूजाविधी कृपया मला सांगा. उद्धवाने एव्हढी कळकळीची विनंती केल्यावर भगवंत संतोष पावले. उद्धव हा आपला अनन्य भक्त आहे हे जाणून त्याच्याबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले. भक्ताच्या योगक्षेमाची म्हणजे त्याचे आत्यंतिक भले करण्याची जबाबदारी भगवंतांचीच असते. त्यासाठी जे काही करायला हवे ते पूर्णपणे करण्यासाठी, उद्धवाच्याबद्दल आत्मकृपेने कळवळलेल्या मनाने भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा! कर्मकांडांच्या विस्ताराला काही मर्यादाच नाही म्हणून मी थोडक्यात पहिल्यापासून याचे वर्णन करतो. वेदशाखातील सार निवडून काढून संक्षेपाने सांगतो. पूजाविधीचे सार वैदिक, तांत्रिक व मिश्र असे तीन प्रकारचे आहे. विधी उपचाराच्या विभागांप्रमाणे त्यांचाही विचार ऐक. या तिन्हींपैकी जो अनुकूल वाटेल, त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. मला जे योग्य वाटतंय ते सार रूपाने तुला सांगतो. तथापि भक्ताने त्याला आवडेल, अनुकूल असेल त्या पद्धतीने भक्तिपूर्वक माझी पूजा करावी. असे म्हणून भगवंतानी वैदिक, तांत्रिक व मिश्र प्रकारच्या पूजेचे विधी सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले, प्रथम वैदिक मार्ग सांगतो. वेदातले मंत्र व वेदातलेच विधी घेऊन माझी साङ्ग पूजा करणे हा वैदिकमार्ग होय. तांत्रिक पूजाविधीला आगम प्रयोग असे म्हणतात. त्यासाठी आगमातलेच मंत्र व आगमातलेच विधी घेऊन माझी पूजा आगमोक्त रीतीने करणे ह्याचे नाव ‘तंत्रमार्ग’ होय. आता मिश्रविधी कसा असतो तो ऐक. वेदातले मंत्र आणि तंत्रांतले विधी, अशा दोन्ही प्रकारांचे मिश्रण करून माझी पूजा करणे याचे नाव ‘मिश्रमार्ग’ होय. या तीन प्रकारच्या विधींनी माझी यथासांग पूजा करणे, हाच माझा तीन प्रकारचा याग होय. ह्याच्या योगाने मी श्रीकृष्ण संतोष पावतो, आणि सपरिवार जवळ उभा राहतो. याप्रमाणे माझे भजन तीन प्रकारचे आहे. ज्या प्रकारावर ज्याची पूर्ण श्रद्धा असेल, त्या विधीने त्याने भजन करावे. तेच भक्तीने केले असता कोणत्याही विधीने मला सारखीच तृप्ती होते. भक्तिभावाने माझे भजन पूजन झाले की, मी अत्यंत तृप्त होतो. हा आगमोक्त यज्ञ असून तिन्हीची लक्षणे सारखीच आहेत. उद्धवा माझी पूजा भक्तिपूर्वक आणि निष्कपट भावाने केली पाहिजे. मी सर्वांचा पिता असून गुरुरूप आहे. समग्र पूजासामग्री घेऊन माझी पूजा केली असता मी प्रसन्न होतो. मला पूजण्यासाठी माझी मूर्ती, यज्ञवेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय, ब्राह्मण या ठिकाणी माझे वास्तव्य आहे अशी भावना व्यक्त करून माझी आराधना करावी. आपल्याला प्रिय असेल ती ‘प्रतिमा’ हे माझे पूजेचे पहिले स्थान होय. जमिनीवर ‘स्थंडिल’ (मातीचा चौकोनी ओटा) करून, त्याची पूजा करणे, हे माझ्या पूजेचे दुसरे स्थान होय. ‘अग्नीचे तेज’ हे माझंच स्वरूप आहे म्हणून ते माझे तिसरे पूजेचे स्थान होय आणि ‘सूर्यमंडळांची पूजा हे माझे चवथे पूजास्थान होय.’ उदकामध्ये ‘माझे पूजन करणे हे पाचवे पूजास्थान आणि ‘हृदयामध्ये’ माझे आवाहन करणे हे सहावे पूजास्थान होय. शाळिग्राम हे माझे अचेतन स्वरूप असून, ‘ब्राह्मण’ हे माझे सचेतन स्वरूप आहे. ते अखंड पूर्ण परब्रह्मच होय. म्हणून त्यांची सन्मानपुर:सर षोडशोपचार पूजा करावी. ब्राह्मणांच्या ठिकाणी ज्याची ब्रह्मभावना असते, तो स्वत: मोठा भाग्यवान् म्हणून समजावे. तो ब्रह्मादिकानांही पूज्य आहे. त्यांनाच काय, मी देवाधिदेव स्वत: त्याला वंदन करतो. ह्या सर्व पूजांमध्येही पूज्यत्वाने पूजा करण्यास योग्य, वरिष्ठांमध्येही अती वरिष्ठ, जो केवळ माझा आत्माच आहे तो ‘गुरुराजा’ सर्वांनाच वंद्य आहे. ज्याचे सद्भावाने चरण धरिले असता मी पूर्णब्रह्म सुखावतो. त्याचे मद्रूपाने स्तवन केले असता मला परमात्म्याला उल्हास वाटतो. सद्गुरूचे नामस्मरण हे भयंकर संसारभयाचे निवारण करते, जन्ममरणाचे निरसन करून निजात्मबोधाने पूर्ण तृप्त करून सोडते. मी परमात्मा नारायण गुरुरूपाने प्रगट होऊन शिष्याच्या द्वारे परब्रह्माचे पूर्णत्व प्रकाशित करतो.








