कमी पावसाचा फटका : पेरणीत घट, पीकेपीएसमध्ये बियाणे पडून
बेळगाव : यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे लाखो टन बियाणे गोदामात पडून आहेत. दरम्यान, रयत संपर्क केंद्र, प्राथमिक कृषी पत्तीन संघांमधून अपेक्षेप्रमाणे बियाणांची उचल न झाल्याने बियाणांचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पीकेपीएस संघासमोर अडचणी वाढल्या आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मका, भुईमूग, तीळ, राजगिरा, उडीद, सूर्यफुल, ज्वारी, सोयाबीन आदी बियाणांची तजवीज केली होती. शिवाय पीकेपीएसमध्ये बियाणांचा साठा करून ठेवला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने बियाणांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे बियाणे पीकेपीएसमध्ये पडून असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 50 हजार क्विंटल बियाणांच्या साठ्यापैकी 23,320 क्विंटल बियाणांचे वितरण झाले आहे. अद्यापही 26,680 क्विंटल बियाणे शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बियाणांची देखभाल आणि इतर बाबींबाबत पीकेपीएसची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात 7.25 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 4.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. 80 टक्के पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी अद्यापही 20 टक्के पेरणी शिल्लक आहे. पावसाअभावी उर्वरित पेरणी रखडली आहे. त्यामुळे बियाणांची मागणीदेखील कमी झालेली पहायला मिळत आहे.
23,320 क्विंटल बियाणांचे वितरण
यंदा शेतकऱ्यांना मागणीनुसार बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी केली नाहीत. जिल्ह्यात 50 हजार क्विंटल बियाणाच्या साठ्यापैकी 23320 क्विंटल बियाणे वितरित झाली आहेत.
– शिवनगौडा पाटील (कृषी खाते सहसंचालक)









