चिपळूण :
पशुधनाच्या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी 1977 पासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील 6 जिह्यांसाठी चिपळूण येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे आता मुंबईतील आरे कॉलनीत स्थलांतर होणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीवर बुधवारी शासन निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. ठाणे, पालघर, रायगड जिह्यात सर्वाधिक पशुधन असल्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असून आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला लगतच्या कोल्हापूरच्या प्रयोगशाळेशी जोडण्यात आले आहे.
पशुधनाच्या आजाराचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार व्हावेत, पशुधनामध्ये येणाऱ्या साथीच्या रोगाची लक्षणे विचारात घेऊन या रोगाचे रोग निदान करुन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात 8 विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी पुणे विभागात पुणे व कोल्हापूर अशा 2 प्रयोगशाळा कार्यान्वित असून उर्वरित 6 प्रयोगशाळा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर व चिपळूण येथे कार्यरत आहेत. कृषी व सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार 10 ऑक्टोबर 1974 रोजी चिपळूण शहरातील मार्कंडी येथे कोकण विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. ही प्रयोगशाळा 1 एप्रिल 1970 पासून प्रत्यक्षात कार्यान्वित झाली.
सद्यस्थितीत ही प्रयोगशाळा येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारतीमध्ये कार्यान्वित असून या प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग या कोकणातील सहा जिह्यांचा समावेश आहे. मात्र अलिकडच्या काळात या प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रातील 6 जिह्यांच्या पशुधनाच्या संस्थेचे अवलोकन केल्यानंतर ठाणे, पालघर, रायगड या जिह्यात एकूण 89,94,819 कुक्कुट पक्षी व 8.38.540 पशुधन घटक संख्या आहे. पालघर, ठाणे व रायगड जिह्यातील काही भाग दुर्गम असल्याने चिपळूण येथून रोग निदानविषयक कामकाज करणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कठीण होत होते. त्यामुळे या भागातील पशुधनास रोग निदानाच्या सेवा पुरवणे सुकर व्हावे, यासाठी या प्रयोगशाळेचे स्थलांतरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यानुसार 2023 पासून या प्रयोगशाळेच्या स्थलांतरावर चर्चा सुरू झाली. त्यानुसार पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील पशुधनाची संख्या व गुण नियंत्रण प्रयोगशाळेचे गोरेगाव, मुंबई येथे उपलब्ध इमारत ही बाब विचारात घेवून चिपळूणच्या प्रयोगशाळेचे मंजूर पदांसह स्थलांतरण उपायुक्त पशुसंवर्धन, गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगांव (पूर्व), मुंबई या संस्थेच्या इमारतीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता स्थलांतराने स्थापित होणाऱ्या या प्रयोगशाळेचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांपुरते राहणार असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश लगतच्या कोल्हापूर विभागीय प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे.
- पाच वर्षांपासून चिपळूणच्या प्रयोगशाळेकडे दुर्लक्ष
येथील प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्तांसह पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहक, परिचर अशी एकूण 11 पदे मंजूर आहेत. मात्र अलिकडच्या काळात ही सर्व पदे रिक्त आहेत. 2 वर्षांपासून परिचरही भरला गेलेला नाही. त्यामुळे सध्यस्थितीत ही प्रयोगशाळा फक्त नावापुरती राहिली होती. जिल्हा पशुसंवर्धन सर्व चिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे येथील सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे..








